पालघर: बेकायदेशीर शिक्षक भरतीला शिक्षणाधिकाऱ्यांची मूकसंमती? शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागणार..!

0
455

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातील माकुणसार येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित एस. के. पाटील विद्यामंदिर या अनुदानित माध्यमिक शाळेत फेब्रुवारी २०१२ मध्ये सुरेश कोलेकर या मागासवर्गीय संवर्गातील शिक्षकाची भरती करण्यात आली होती. सदर भरती हि नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांनी माहिती अधिकारान्वये मिळालेल्या सदोष माहितीचा आधार घेत केला होता. असे असताना तत्कालीन पालघर शिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी न करता त्या शिक्षकास नियुक्ती पत्रक दिल्याचा आरोप प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांनी केला आहे. वर्षानुवर्षे या गैरप्रकाराबाबत आवाज उठवूनही आणि सर्व पुरावे देऊनही कारवाई केली जात नसल्याने या प्रकरणातील भ्रष्टाचाऱ्यांना जाणूनबुजून अभय तर दिले जात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरटीआय कार्यकर्ते प्रथमेश यांनी भरती प्रक्रियेबाबत माहिती मिळावी यासाठी केलेल्या अर्जावर मिळालेली माहिती तद्दन खोटी असल्याची तक्रार तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्याकडे केली होती. तसेच सदर भरती शासनाने दिलेल्या नियमानुसार झाली नसल्याचे सर्व पुरावे शिक्षण विभागास दिले होते. अशाप्रकारची भरती करत असताना स्थानिक दैनिकात जाहिरात देणे, नवीन शिक्षक भरतीवेळी स्वयंरोजगार केंद्राचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची विहित नमुन्यातील नोंद, उमेदवारांच्या निवडीबाबतचा पत्रव्यवहार अशा अनेक गोष्टींमध्ये अनियमितता झाल्याचे पुरावे आरटीआय कार्यकर्त्याने दिले होते.

१९ ऑगस्ट २०१५ रोजी सदर शिक्षकास चौकशी पूर्ण झाल्याशिवाय नियुक्ती पत्रक देऊ नये अशी विनंती शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. असे असताना तत्कालीन पालघर शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या कार्यालयातुन अतिशय घाईघाईने त्या शिक्षकास कायम करण्यास मान्यता देण्यात आली होती. या घटनेला वर्षा मागून वर्षे लोटत आहेत मात्र अद्याप याप्रकरणात कोणतीच कारवाई केली जात नसल्याने या प्रकरणातील भ्रष्टाचाऱ्यांना जाणूनबुजून अभय तर दिले जात नाही ना असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे माहिती अधिकारात खोटी माहिती देणाऱ्या जनमाहिती तथा मुख्याध्यापक यांच्यावर, त्यांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच शिक्षकभरती बंद असताना चुकीच्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात भरलेल्या बोगस शिक्षकांची चौकशी करण्यात यावी यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत न्याय मिळत नसल्याने आरटीआय कार्यकर्ते प्रथमेश प्रभूतेंडोलकर यांनी मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना इत्यंभूत माहिती देत घटनाक्रम सांगितला. देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांना मूल्य शिक्षण देत त्यांच्या जीवनाचा पाया भक्कम करणाऱ्या शिक्षण विभागालाच भ्रष्टाचाराची कीड लागली तर असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

“शिक्षक भरती करताना शासनाचे निकष नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत, वारंवार पाठपुरावा करूनदेखील याप्रकरणात दोषींची चौकशी करण्यात येत नाही. जबाबदार अधिकाऱ्यांकडून त्यांना अभय दिले जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रसंगी शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.” – प्रथमेश प्रभूतेंडोलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here