१० वी व १२ वी च्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा उपलब्ध करून द्या – आमदार विनोद निकोले

0
379

पालघर-योगेश चांदेकर :

डहाणू- १० वी व १२ वी च्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा उपलब्ध करून द्या अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी डहाणू बस स्थानक आगार प्रमुख यांच्या कडे केली आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, डहाणू व तलासरी भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा, उपलब्ध व्हावी, तसेच मासिक पास सेवा, तसेच इतर सेवेचा लाभ मिळावा. तसेच एस. टी कडून ०२ – ०२ महिने विद्यार्थ्यांचे पास थांबवून ठेवण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस प्रवास परवडत नसे, त्यामुळे आगार अधिकारी यांना आमदार विनोद निकोले यांच्या शिष्टमंडळाने जोरदार धारेवर धरले. तसेच १० वी व १२ वी हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाचे असते. त्यात विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. त्यात परीक्षा केंद्र हे लांब – लांब असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचायला वेळ लागू नये. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचावा या दृष्टीने आम्ही डहाणू बस स्थानक आगार यांना भेट दिली आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्यातरी आजच्या आधुनिक युगात प्रवासाची साधनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एकविसाव्या शतकातही विद्यार्थ्यांना पायी प्रवास करून शिक्षणासाठी जावे लागत असेल तर ते नक्कीच दुर्दैवी आहे. अशा गंभीर समस्या सोडवणे हेच लोकप्रतिनिधींचे काम असते. असे आमदार विनोद निकोले म्हणाले. तसेच एकाग्रतेने परीक्षेला सामोरे जा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा असे सांगत १० वी व १२ वी च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार कॉ. विनोद निकोले, किसान सभा डहाणू तालुका अध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखाना, डहाणू शहर युनिट सेक्रटरी कॉ. धनेश अक्रे, डोंगरी पाडा सेक्रटरी विजय वाघात हे देखील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here