पालघर-योगेश चांदेकर :

पालघर- 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे मूठभर धनधाडग्यांनी लुबाडून घेतले. आपल्या मतावर निवडून आलेल्या पुढाऱ्यांनी लुबाडले, आजही गरीब आदिवासी कष्टकरी बांधवांच्या नशिबी पारतंत्र्याचा अंधारच आहे, मग कसे मानायचे हा देश स्वातंत्र्य आहे? कुठे आहे गरीब आदिवासींच्या हक्काचे स्वातंत्र्य असा संतप्त सवाल श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी केला.नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे आयोजित श्रमजीवी संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते.

आज सुरगाणा येथे पोलीस ग्राउंडवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख मार्गदर्शक विवेक पंडित यांनी यावेळी अत्यंत उद्विग्न होऊन आदिवासींच्या बिकट अवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तर वर्षानंतरही आदिवासी गरीब कष्टकरी माणूस पारतंत्र्याच्या अंधारातच चाचपडत आहे. या इतक्या वर्षात झालेला तथाकथीत विकास फक्त नेत्यांचा झाला मात्र मतदार आणि या देशाचा खरा मालक आदिवासी मात्र स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतर देखील आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित आहे. आजही अदिवासी गरिबांना जगण्यासाठी (आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी) गाव सोडून शेकडो मैल दूर जावे लागते मात्र अनेकदा परत घरी येताना त्या दुर्दैवी मजुराचे प्रेत परत येतअसें असेल तर यापेक्षा दुर्दैव ते काय असेल असा सवाल त्यांनी केला.

देश स्वतंत्र झाला असे आम्ही कसे काय म्हणायचे? असे सांगत पंडित यांनी आता आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल असे सांगितले. आपल्याला 1947 ला मिळालेलं स्वातंत्र्य जर प्रत्येक गरीब आदिवासी कष्टकऱ्याच्या झोपडीपर्यंत पोहचवायचे असेल तर आपण प्रत्येकाने या लढाईत उतरावे लागेल. स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न उराशी बाळगून या स्वातंत्र्य भारताच्या ब्रिटिशी मानसिकतेच्या राज्यकर्त्यांविरोधात लढावे लागेल असे त्यांनी सांगितले.

सद्या श्रमजीवी संघटनेने वेठबिगार मुक्ती मोहीम युद्धपातळीवर हातात घेतली आहे, वीटभट्टी आणि इतर ठिकाणी आदिवासींना गुलामसारखी वागणूक देणाऱ्या मालकांविरोधात संघटनेने लढा उभारला आहे. यात मागील महिन्यात घोटी पोलिसांनी वेठबिगारीचा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केलेली याचा उल्लेख करत पंडित यांनी अशा मनमानी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा समाचार घेतला, तर याचवेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी मोर्चाचा इशारा देताच गुन्हा दाखल केल्याचा उल्लेखही केला. स्वातंत्र्याचा अंधारात दारिद्र्य आणि भुकेने तळमळणाऱ्या गरीब आदिवासींच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचा निर्धार यावेळी पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.

या मेळाव्याला विवेक पंडित यांच्यासोबत श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,विजय जाधव, रामराव लोंढे, भगवान मधे, सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू राऊत, दिनेश मिसाळ, संतोष ठोंबरे, संजय शिंदे, सीता घाटाळ, तानाजी शिद, निता गावंडा, मुरलीधर कानोज, चंदर कुवर, भगवान डोखे, संतोष निरगुडे व महिला पुरूष मोठ्या संख्यने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here