महाराष्ट्रातील सहा सायकलस्वारांनी इंडियागेट येथे उभारली मतदान जागरूकतेची गुढी

0
1192

मुंबई ते दिल्लीपर्यंतचा प्रवास 72 तासांत पूर्ण

नवी दिल्ली, दि. 7 :  नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या सहा सायकलस्वारांनी मतदानविषयक जागरूकतेचा संदेश देण्यासाठी मुंबई ते दिल्ली हा 1440किलोमीटरचा प्रवास 72 तासांत पूर्ण करत गुढी पाडव्याच्या दिवशी राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेट येथे गुढी उभारली.

सध्या देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याचेच औचित्य साधत मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविण्याबाबत जागरूकता करण्यासाठी नाशिक येथील सायकलिस्ट फाऊंडेशनच्या सायकलस्वारांनी  मुंबई ते दिल्ली असा प्रवास पूर्ण केला. 3 ते 6 एप्रिल 2019 दरम्यान या सायकलस्वारांनी प्रवास पूर्ण केला आहे.

चंद्रकांत नाईक  यांच्या नेतृत्वाखाली  श्रीराम पवार, मोहन देसाई, राजेंद्र गुंजाळ,रविंद्र दुसाने आणि प्रथमच मतदानात सहभागी होण्यास उत्सुक असलेला 18वर्षांचा  पूर्वांश लखलानी या सायकलस्वरांनी या उपक्रमात सहभाग घेतला व उपक्रम यशस्वी केला. हे सर्व सायकस्वार नाशिकचे असून त्यांनी  आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली व आपल्या प्रवासाबाबत त्यांनी माहिती दिली.

…अशी सुचली संकल्पना!

नाशिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मतदार जागरूकतेसाठी ‘नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन’च्या सायकलस्वारांना नुकतेच आमंत्रित केले होते. सायकलस्वारांनी मतदान जागरूकतेबाबत केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे यातील सायकलस्वारांनी दिल्लीतील इंडिया गेटपर्यंत सायकलने प्रवास करून मतदान जागरूकता करण्याचा निर्णय घेतला. मतदान जागरुकता कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी मतदानाची नोंद झालेला दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडून येथूनच सायकल प्रवासाला सुरुवात करण्याचे ठरले .

3 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून दिले प्रोत्साहन    

मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे,उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि  वरिष्ठ पोलीस अधिकारी तथा नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिश बैजल यांनी 3 एप्रिल2019 रोजी सकाळी 7.30 वाजता मुंबई येथील हुतात्मा चौकात या सायकलस्वारांना हिरवी झेंडी दाखवली व त्यांच्या सायकल प्रवासाला सुरुवात झाली.

जागोजागी केली मतदान करण्याबाबत जागरूकता

मुंबईहून सुरु झालेल्या प्रवासात वापी (गुजरात), सुरत (गुजरात), ब्यावर (राजस्थान) आदी ठिकाणी चौका-चौकात मतदान जागरूकतेचा कार्यक्रम घेऊन या सायकलस्वारांनी मतदान जागरूकता केली. मतदानाचे महत्त्व समजावून सांगत त्यांनी लोकांना मतदान करण्याची प्रतिज्ञाही दिली. ‘मतदान करा आणि आपला अधिकार बजावा’ असे संदेश या सायकलस्वारांच्या सायकलींवर लिहिण्यात आले हेाते.

दररोज 480 किलोमीटरचा प्रवास

या सायकलस्वारांनी रिले  प्रकारानुसार एकावेळी दोन चालक या प्रकारे प्रवास केला. ताशी 20 कि.मी. प्रमाणे दिवसाला(24 तासात) 480 कि.मी. त्यांनी  दिवस व रात्र असा अव्याहत प्रवास केला. त्यांनी  महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान,हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून एकूण 1440 किलोमीटरचा प्रवास 72तासात पूर्ण केला. सध्या उन्हाळा असल्याने या प्रवासात दररोज एक सायकल किमान तीन वेळा पंक्चर होत असे. जयपूर येथे सोसाट्याचा वारा व गारपिट अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामनाही या सायकलस्वारांनी केला.

अखेर 6 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी दिल्लीतील इंडिया गेटवर सकाळी7.30 वाजता हे सायकलस्वार पोहोचले व त्यांनी येथे गुढी उभारून या प्रवासाची सांगता केली. भारतीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सायकलस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here