पालघर – योगेश चांदेकर:
वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या ३ वर्षाच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना तर इतर 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. यामध्ये पालघर तालुक्यातील ८ जणांचा तर डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कासा येथील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. सफाळे भागातील तीन जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. मात्र हे रुग्ण मुलीच्या संपर्कातील नाही.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कासा येथे सुट्टी संपवून १०-११ दिवसांपूर्वीच मुंबईहून कामावर रुजू झालेल्या दोन शिकाऊ (इंटर्न) डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गंजाड येथील ३ वर्षीय मुलीच्या संपर्कात आल्याने त्यांचे विलगीकरण करून स्वॅब सॅम्पल कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल आज उशिरा प्राप्त झाला आहे. असे असले तरी या दोघांना त्या मुलीच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे कि त्यांच्या पूर्व प्रवास इतिहासातून लागण झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.
दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे समजते तसेच ते आपली दैनंदिन सेवा बजावत होते. मात्र ३ वर्षीय मुलीची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्याने त्यांच्यासह इतर ६ जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु असून त्या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्यांची स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती कासा रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे.
डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कासा येथील ८ जण (नर्सेस, इतर कर्मचारी), उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथील १६ (१ डॉक्टर व मुलीचे नातेवाईक) व पालघर तालुक्यातील काटाळे, मासवन या भागातील आशा वर्कर, नर्स व डॉक्टरसह १८ असे एकूण ४२ जण कोरोनाबाधित मुलीच्या संपर्कात आले होते. त्यापैकी काही जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून अद्याप काही अहवाल प्रतीक्षेत आहेत.