पालघर: बोईसरमधील हजारो किलो धान्यसाठा अवैध? तपास यंत्रणांचा लागणार कस..!

0
420

पालघर – योगेश चांदेकर:

उपविभागीय प्रांत अधिकारी विकास गजरे यांनी बोईसर भंडारवाडा येथे शनिवारी (४ एप्रिल २०२०) दुपारी ०३:०० वाजता पकडलेल्या हजारो किलो अन्नधान्याचा अवैधपणे साठा केल्याबाबत बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी सदर मालाचा साठा करणेत आला होता त्या जागेचे भाडेपत्रक देखील केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान बोईसरमध्ये शनिवारी (४ एप्रिल २०२०) दुपारी ०३:०० वाजता उपविभागीय प्रांत अधिकारी विकास गजरे हे बोईसर भंडारवाडा येथून जात असताना त्यांना रस्त्यावर तांदूळ गोण्या असणारा मालवाहू ट्रक दिसला. याबाबत त्यांनी माल उतरवून घेणाऱ्या हमालांकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये सुमारे 19 टन तांदुळ असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ट्रकमधील माल शेजारीच असणाऱ्या अशरफ कासन मेमन यांच्या घर क्रमांक १९०५ मध्ये एका खोलीमध्ये उतरविण्यात येत असल्याचे समजताच त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता हजारो किलो तांदूळाचा साठा करून ठेवण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी अधिक खोलात पाहणी केली असता शेजारीच ए टु झेड मॅचिंग सेंटर याठिकाणी देखील असाच अवैधपणे धान्य साठा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सदर वाहनाची इन्व्हाईस तपासले असता तो ट्रक श्री आदी परसकट्टी ऍग्रोटेक, रायचूर कर्नाटक यांच्याकडून डहाणू येथील व्यापारी मे. एन. भावेश कुमार कंपनी यांच्याकडे पाठवल्याचे आढळून आले. असे असले तरी,

यानिमित्ताने खाली दिल्याप्रमाणे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत:

  • इन्व्हाईस मध्ये उल्लेख केलेल्या कंपन्या खरंच अस्तित्वात आहेत का?
  • संबंधित कंपनीने या मालाची ऑर्डर कधी दिली होती?
  • डहाणू मध्ये नेण्यात येणारा हा तांदूळ बोईसरमध्ये का उतरून घेण्यात आला?
  • हा तांदूळ बोईसर पर्यंत कुठून कसा पोहोचला?
  • यामध्ये डहाणू येथील व्यापारी बोईसर भागात धान्याचा काळाबाजार तर करत नाहीत ना?
  • बोईसर मध्येच ए टु झेड मॅचिंग सेंटर याठिकाणी आढळलेला हजारो किलोचा धान्यसाठा कुणी केला आहे?
  • दोन्ही ठिकाणी केलेला धान्यसाठा हा एकाच व्यक्तीने केला असेल का?
  • अशरफ कासन मेमन यांच्या घर क्रमांक १९०५ चे भाडेकरारपत्र नसताना तेथे धान्य साठा का व कसा करण्यात आला?
  • १९ टन तांदूळ याव्यतिरिक्त याठिकाणी केलेला इतर धान्यसाठा अवैध नसेल कशावरून?
  • तांदूळ सोडून इतर धान्यसाठा त्याठिकाणी कुणी, कधी व कुठून आणला?
  • हा प्रकार गेल्या किती दिवसांपासून सुरु आहे?
  • प्रांत अधिकारी विकास गजरे यांनी हा प्रकार पाहिला नसता तर हेच आणखी किती दिवस चालू राहिले असते?
  • अन्नधान्य तुटवडा असताना देखील पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष कसे काय होते आहे?

“उपविभागीय प्रांत अधिकारी विकास गजरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्याठिकाणी साठा करून ठेवण्यात आला होता तेथील पंचनामा करून ते सील करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.” – प्रदीप कसबे (पोलीस निरीक्षक, बोईसर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here