मुंबई ई न्यूज नेटवर्क:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांच्या विविध मागण्यांसाठी ७ सप्टेंबरपासून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय वझे, मुंबई ई न्युजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्यासह ८ बाधित शेतकरी उपोषणात प्रत्यक्ष सहभागी आहेत तर आत्तापर्यंत या उपोषणाला शेकडो हुन जास्त शेतकऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काळजी घेत आपले जाहीर समर्थन दिले आहे.

दरम्यान उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून काही उपोषणार्थ्यांची प्रकुर्ती खालावली आहे. त्यामुळे मागण्यांबाबत त्वरित निर्णय न झाल्यास मोठा प्रसंग उद्भवू शकतो. दरम्यान आंदोलन स्थळास भेट देत अनेक संघटनांनी, तसेच राजकीय पक्षांनी उपोषणास व मागण्यांस आपला पाठिंबा दर्शिविला आहे. मानवाधिकार मिशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरबंशसिंग (पपूभाई) नन्नाडे, किसान काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पालघर जिल्ह्यध्यक्ष, सामाजीक कार्यकर्ते संतोष वझे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान काल उप जिल्हाधिकाऱ्यांनी १४ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून शेतकऱ्यांनी आश्वस्त करत एकूण १३ मागण्यांपैकी ११ मागण्या अंशतः मान्य करत पुढील महिन्याभरात यावर कार्यवाही सुरु करू असे सांगितले. मात्र याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी लिहून न दिल्याने उपोषण मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या चर्चेदरम्यान उप जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी,पोलीस प्रशासन यांच्यासह रिलायन्सचे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्यावर राजकीय दबावातून दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा रद्द करावा या मागण्या त्वरित मान्य कराव्या तरंच उपोषण स्थगित करू अन्यथा प्रसंगी प्राण त्याग करू असे सामाजिक कार्यकर्ते व आंदोलक विजय वझे यांनी मुंबई ई न्यूजशी बोलताना सांगितले. त्यामुळे प्रशासन याप्रकरणी काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here