पालघर : डहाणू तालुका पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला!

0
436

पालघर : डहाणू तालुका पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चौथ्या धक्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नागरिकांना भूकंपाच्या सावटाखाली जगावं लागत आहे. या परिसरात २०१८ पासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रात्रभर आलेले भूकंपाचे धक्के

रात्री ३ वाजून २९ मिनिटांनी ३.५ रीश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणूजवळील समुद्रात १० किलोमीटर भूगर्भात झाल्याची नोंद आहे. तर इतर धक्क्यांची मालिका ३ वाजून ४३ मिनिटांनी २.८ रीश्टर स्केल, ३ वाजून ४५ मिनिटांनी २.६ रीश्टर स्केल, ३ वाजून ५७ मिनिटांनी ३.५ रीश्टर स्केल, ५ वाजून ४ मिनिटांनी २.२ रीश्टर स्केल, ६ वाजता ४.२ रीश्टर स्केल, ७ वाजून ६ मिनिटांनी ४.२ रीश्टर स्केल अशा तीव्रतेची होती.

काल रात्री ११ वाजल्यापासून आणि आज सकाळी ७ पर्यंत भूकंपाचे सौम्य व मध्यम स्वरूपाचे धक्के बसल्याची नागरिकांनी माहिती दिली. तलासरी, धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, कासा, बोर्डी, दापचरी, धानिवरी, आंबोली, चिंचणी आणि आजूबाजूच्या परिसरात हे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद राष्ट्रीय सिसमोलॉजिस्टिक सेंटरच्या संकेत स्थळावर करण्यात आली आहे.

या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा सुरू झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांच्या सत्रांमुळे पालघर प्रशासन या भागाकडे कसे लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here