पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यात डिसेंबर ते मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड होते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका या पिकाला बसला आहे. गेल्या काही दिवसांत संचारबंदीमुळे कलिंगडाच्या विक्रीत सुमारे 95 टक्के घट झाली आहे. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे कोलमडला आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या वक्रदृष्टीत अडकलेला शेतकरी उसनं बळ आणून उसनवारी करत प्रसंगी बँकांकडून, सावकारांकडून कर्ज घेऊन पीक वाढवत आहेत. नैसर्गिक आपत्तीचे वादळ येत आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक क्षणात मातीमोल होत.

कलिंगड उत्पादन घेत असताना बियाणी-रोपे, सिंचन सुविधा, फवारणी, खते, लागवड खर्च, अंतर मशागत यासह अन्य खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. मात्र कलिंगड उत्पादकांना माल बाजारपेठेत नेता येत नसल्याने जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पालघर तालुक्यातील कोळगाव वंकासपाडा येथील भरत कोलेकर यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रात कलिंगडाची डिसेंबर महिन्यात लागवड केली आहे. यासाठी त्यांनी देना बँकेकडून अडीच लाख रुपये इतकं कर्ज कर्ज घेतलं आहे. या कलिंगड पिकामध्ये त्यांना तब्बल साडेचार लाख रुपये इतका तोटा झाला आहे. याशिवाय त्यांनी तीन महिने स्वतः व कुटुंबीयांनी घेतलेली मेहनत देखील मातीमोल ठरलीय. याबरोबरच मजुरांचा हक्काचा रोजगार गेल्याने ते देखील उघड्यावर आलेत.

पालघर जिल्ह्यात अनेक शेतकरी हे तरकारी पिकांचे (नगदी पिके) उत्पादन करतात. यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना लॉक डाऊनचा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसमुळे जागतिक मंदीचे संकट घोंगावत असताना याच कोरोनामुळे शेतकऱ्यांचं देखील तूर्तास भरून न निघणारे नुकसान झाले आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा समजून या संकटातून सावरण्यासाठी योग्य ती मदत करावी अशी मागणी भरत यांच्यासारखे असंख्य शेतकरी करत आहेत.

  • “सामाजिक जाणिवेच्या भावनेतून अनेकांना संकटकाळात मोफत कलिंगड दिलेत. कलिंगडे विक्रीविना पडून असल्याने ती खराब होऊन फेकून देण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये गुंतवून आणि घाम गाळून पिकवलेल्या कलिंगडांची माती होताना डोळ्यांनी पहावे लागत आहे. सरकारने सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.” – भरत कोलेकर, कलिंगड उत्पादक शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here