कोल्हापूर: नामांकित बिल्डरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न? ‘त्या’ प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी..

0
10768

मुंबई ई न्यूज नेटवर्क (कोल्हापूर प्रतिनिधी):

प्राणी असो वा पक्षी स्वतःच्या हक्काचा निवारा हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय.. घरकुल.. घरटं.. वास्तू अशी नानाविध नावं असली तरी मनातलं घर अन घरात रमणारं मन. कितीतरी कवी मनांनी या घरट्याच्या संकल्पनेभोवती शब्दांचं जाळ विणलं अगदी सुगरण पक्षीणीने खोपा वीणावा तसा.
“तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं..
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं..
नव्या घरामंदी काय नविन घडंल..
घरकुलासंग समदं येगळं होईल..
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल..!”

सुधीर मोघे यांनी शब्दबद्ध केलेल्या तर आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी गायलेल्या ‘शापित’ या चित्रपटातील या गीताने घराच्या कल्पनेला चार चांद लावले. फाटक्या जीवनाला आशेची ठिगळं जोडणा‍‍ऱ्या एका जोडप्याची कहाणी, संसार सुरु झाल्यावर माणसाचं आयुष्य बदलून जातं. त्यातच नव्या स्वप्नांची, घराची चाहूल लागते तेव्हा तर आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर असते. चित्रपटालाहि लाजवेल अशा प्रकारचं आयुष्य अनेकजण जगत असतात. एखादा ओपन प्लॉट घेऊन त्यावर अगदी स्वप्नातलं घरकुल बांधणं हि स्वर्गसुखापेक्षा मोठी गोष्ट. ‘आपलं घर होणार’ या आनंदात असताना स्वप्नांमधल्या घराला हवे ते रंग भरण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत असतो. प्रसंगी काळ-वेळ, तहानभूक विसरून आपण झपाटल्यागत त्या स्वप्नाचा पाठलाग करत असताना आपली फसगत झाली तर? अन हि फसवणूक एखाद्याने नियोजनबद्धरित्या केली तर? एखाद्या चित्रपटाची स्टोरी आहे कि अशी घटना खरोखर घडली आहे?

..तर घडलं असं कि, कोल्हापुरात गेल्या दहा वर्षांपासून एक संगणक अभियंता स्वतःच्या मालकीची छोटीशी कंपनी हिच आपली ओळख मानून ती मोठी करण्यासाठी स्वतःला झोकून देत काम करत राहिला. शहरात ऑफिस अन घर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने कामासाठी मोठी धावपळ करावी लागते अन वेळही जातो यामुळे शहरालगतच ओपन प्लॉट घेऊन एकाच ठिकाणी घर व ऑफिस करण्याचा विचार त्याच्या डोक्यात येतो. याबाबत तो पत्नीशी बोलतो, त्यावेळी आपल्या पतीचे प्रवासामुळे होणारे हाल विचारात घेत ती देखील यांस होकार देते. योगायोग कि दुर्भाग्य म्हणा, एकदिवस त्याला “शहरापासून १० मिनिटांच्या अंतरावर.. विमानतळापासून १० मिनिटांच्या अंतरावर.. सुसज्ज सर्व सोयींनीयुक्त बिगरशेती प्लॉट..” अशा आशयाची जाहिरात असलेला बोर्ड दिसतो. अगदी क्षणाचा देखील विलंब न करता तो त्या जाहिरातीचा फोटो घेतो आणि दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करतो. समोरील व्यक्ती हि नामांकित बिल्डर आहे हि माहिती अगोदरच असल्याने कागदपत्रांची खातरजमा करावी असा संशय मनाला शिवत देखील नाही. तो उत्साहाच्या भरात जागा पाहतो आणि ठरवतो कि कोपऱ्यातील सलग दोन गुंठे जागा घेतल्यास रस्त्यावर कमी वर्दळ येऊ शकते त्यामुळे कार पार्किंग आणि ऑफिस स्टाफ साठी पार्किंग आरामात होईल. माणूस सुतावरून स्वर्ग गाठतो म्हणतात ते हेच नव्हे काय? कोपऱ्यातील जागेबाबत इतका विचार करत असताना डोक्यावरून जाणाऱ्या हाय होल्टेज विजेच्या तारा देखील माणूस विसरू शकतो. कदाचित त्या व्यवस्थित पहिल्या असत्या तर हा प्लॉट बिगरशेती कसा? हा प्रश्न तरी पडला असता. तसंही नामांकित बिल्डर सांगतोय म्हंटल्यावर प्रश्नच कुठं येतो म्हणा शंका घेण्याचा.

ठरलं, कोपऱ्यातील पाहिलेली जागाच घ्यायची. दहा वर्षांत पोटाला चिमटा घेऊन जमवलेली पै अन पै, घरातील दाग-दागिने गहाणवट ठेऊन, बाबांच्या भविष्य निर्वाह निधीवर कर्ज घेऊन पैसे गोळा करतो अन दोन गुंठे बिगरशेती जमीन खरेदी करतो. संस्कारपत्र झालं, आता खरेदी देखील झाली. हि सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना बिगरशेती जागा असल्याचे पुरावे म्हणून कागदपत्रं देखील जोडण्यात आली. अगदी तहसीलदार मान्यता प्राप्त बिगरशेती लेआऊट देखील. मात्र चित्रपटात इंटरव्हलला उलगडा व्हावा त्याप्रमाणे अभियंता गावकामगार तलाठी यांच्याकडे तो तहसीलदार मान्यता प्राप्त बिगरशेती लेआऊट घेऊन नावनोंदणी करण्यास जातो. अन तलाठी हा बिगरशेती लेआऊट बनावट असल्याचे सांगतो, क्षणात पायाखालची जमीन सरकावी अशी अवस्था त्या अभियंत्याची होते. आता या कहाणीचा उत्तरार्ध सस्पेंस अन ऍक्शन चित्रपटाप्रमाणेच असणार हे सांगायला ज्योतिषी तर नक्कीच लागणार नाही. पुढे तो फसवणूक झालेला अभियंता एका पत्रकार मित्राशी संपर्क साधत त्याला झाल्या प्रकाराची माहिती देतो.

सामान्य माणसाची फसवणूक होते त्यानंतर तो अधिक चोखंदळ, अधिक चिकित्सक बनतो आणि मोठया मोठ्या प्रकरणांचा छडा लावण्याचं काम करतो. वरकरणी लहान वाटणारं हे प्रकरण इतकं मोठं असेल याचा अंदाज देखील येत नाही. मुंबई ई न्यूजने आजवर अनेक प्रकरणांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी यासाठी माननीय दंडाधिकारी करवीर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असून एक मोठं रॅकेट यातून उघडं होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here