पालघर – योगेश चांदेकर:
एकीकडे राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात 400 रुपयांची वाढ करीत निराधारांना मिळणारे मानधन हजार रुपयांपर्यंत पोहचवून गोर गरीब निराधारांना आर्थिक दिलासा दिला आहे. परंतु सध्याचे आहे तेच 600 रुपये मानधन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब उघकीस आली आहे. डहाणू तहीलदार कार्यालयात 27 जून 2019 च्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत पात्र ठरलेल्या 800 लाभार्थ्यांना गेल्या दहा महिन्यापासून मानधन न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

५ लाख लोकसंख्या असलेला आदिवासी बहुल तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या डहाणूत शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना या योजनेअंतर्गत विविध समाजातील विधवा, अपंग, वयोवृद्ध, निराधार, अविवाहीत, क्षयरोगी, कुष्ठरोगी, घटस्फोटित महिला, गंभीर आजाराने पीडित तसेच इतर व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून दरमहा 600 रुपये अर्थ-सहाय्य दिले जाते.
डहाणू तालुक्यात असे एकूण 15,000 लाभार्थी आहेत. दर दोन-तीन महिने शासन हे मानधन प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत परंतु गेल्या वर्षभरापासून गोरगरीब निराधारांना सदर अनुदानासाठी डहाणूच्या संजय गांधी विभागात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. येथील अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे गोंधळ झाला असल्याचे बोलले जात आहे. वरील योजनेचे लाभार्थी हे डहाणूच्या दुर्गम भागातील असल्याने डहाणूत येण्यासाठी त्यांना १५० ते २०० रुपये खर्च करावे लागतात. विशेष म्हणजे कासा, मोडगाव, सुकट अंबा, रायपूर या तालुक्याच्या शेवटच्या कोपऱ्यात डोंगरकुशीत राहणारे अंध-अपंग पीडित आदिवासी लाभार्थी आहेत. दरम्यान दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले असतानाच शासनाकडून या निराधारांना हे तुटपुंजे मानधन मिळते. या मानधनावर त्यांचे निव्वळ उदरनिर्वाह होत असतो, ते मानधनही वेळेवर मिळत नाही. अगदी सहा-
सहा महिने हे मानधन बँक खात्यात जमा होत नसल्याने गोरगरिबांना वारंवार बँकेत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
“जगण्यासाठी होणारी हि थट्टा संबंधितांनी लक्ष घालून थांबवावी आणि सन्मानाने जगण्यासाठी हक्काचं मानधन वेळेत मिळावे” अशी माफक अपेक्षा लाभार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे फेब्रुवारी २०२० पर्यंतचे अनुदान बँकेत जमा केले आहे. कोणी वंचित राहिले असेल तर त्यांना चौकशी करून अनुदान देण्यात येईल.
राहुल सारंग – तहसीलदार डहाणू
माझ्याकडे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळाले नसल्याची तक्रार शेकडो लोकांनी केली आहे. याबाबत तहसीलदारांना योग्य त्या सूचना देऊन लक्ष घालण्यासाठी सांगितले आहे.
विनोद निकोले – आमदार डहाणू विधानसभा