पालघर: कासा पोलीस ठाण्यातील ‘त्या’ तक्रारींचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग..!

0
434

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्या प्रकरणी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दिवससेंदिवस वाढ होत आहे. याप्रकरणी डहाणू तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांनी कासा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दिली. या तक्रारीचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईपोटी मिळालेल्या रकमेतील ३५% रकमेची लुबाडणूक केली. यासंदर्भात आजअखेरीस एकूण १३९ शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे.

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणात तत्कालीन शेतकरी समितीतील लोक, टीव्ही वाहिन्यांचे पत्रकार, सूर्यानगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते, पालघर जिल्हा माथाडी कामगार नेते, तत्कालीन कासा पोलीस स्टेशनमधील काही कर्मचारी, नुकसानभरपाई रक्कम जमा झालेल्या बँकेतील कर्मचारी, पालघर कलेक्टर ऑफिसच्या भूसंपादन विभागातील अधिकारी वर्ग, अशा एकूण पन्नास ते सत्तर जणांचा समावेश असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. सदर गटाने दबाव आणून पैसे लुटल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विजय वझे यांनी हे प्रकरण पुढे आणल्यानंतर मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. वझे आणि चांदेकर यांच्यावर मानहानीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. समाज माध्यमांवर नाहक बदनामी सोसणाऱ्या वझे आणि चांदेकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले व याबाबत गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे वर्ग करण्यात आला. आत्तापर्यंत एकूण १३९ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी फरार आरोपी शेतकऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप वझे यांनी केला असून, फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

तपासादरम्यान पोलीस रिमांडमध्ये अटकेतील आरोपी मधुकर काकरा याने आरोपी निलेश पाटील याच्याकडे ४० लाख रुपये दिल्याच्या नोंदींचे पुरावे मिळाले आहेत. आरोपी निलेश पाटील यास अटकेतील आरोपी नारायण कान्हा डबके याने २८ लाख रुपये दिल्याची देखील नोंद पोलीस रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. आरोपी निलेश पाटील याने पालघर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व अर्ज केला असून त्यावर ३१ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here