पालघर: १० हजारपेक्षा जास्त खलाशांना परत आणण्यात यश – खा. राजेंद्र गावित

0
531

पालघर – योगेश चांदेकर:

केंद्र आणि राज्य शासनाच्या टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील तलासरी आणि डहाणू तालुक्यातील हजारो खलाशी गुजरात व महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या भागात अडकून पडले होते. तसेच जिथे थांबवले होते तिथे त्यांची खाण्या-पिण्याची परवड होत होती. अशा बिकट परिस्थितीत अडकलेल्या खलाशांना खासदार राजेंद गावित यांनी आधार देत पालघरमध्ये सुखरूप परत आणण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आत्तापर्यंत १० हजारपेक्षा जास्त खलाशांना पालघरमध्ये परत आणण्यात यश मिळाले आहे. या संपूर्ण कामामध्ये त्यांना पालकमंत्री दादा भुसे यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे खासदार गावित यांनी सांगितले.

“या विषयात खासदार गावितांनी लक्ष घातले नसते तर आमचे परत येणे कठीण होऊन बसले असते” अशा भावना परतलेल्या अनेक खलाशांनी बोलून दाखवल्या.

डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यांतील हजारो आदिवासी गुजरातमधील पोर बंदर, वेरावळ, मंगळूर, सौराष्ट्र आदी ठिकाणी मच्छीमार बोटींवर खलाशी म्हणून स्थलांतरित झाले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते गुजरातमध्येच अडकून पडले होते. अशावेळी ‘त्या खलाशांना टप्प्याटप्प्याने बोटींद्वारे पालघर जिल्ह्यातील बंदरात आणणे, त्यांना वैयक्तिक काळजी तसेच विलगीकरणाबाबत योग्य सूचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करणे’ हा खासदार गावित यांच्यासाठी जणू नित्यक्रमच बनला होता. बंदरावर आलेला खलाशी त्याच्या गावातील घरात पोहोचेपर्यंत अगदी न चुकता खासदार गावित पाठपुरावा करत होते. हजारो खलाशी स्वगृही परतल्याने खलाशांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आत्तापर्यंत १० हाजापेक्षा जास्त खलाशांना आणण्यात आले असून ५००० खलाशांना परत आणण्याचे काम सुरू आहे. परत आलेल्या खलाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तसेच घरातही योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याकामी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, डहाणू तहसीलदार राहूल सारंग, आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धनारे, डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत, तलासरी पंचायत समिती सभापती नंदू हाडळ, डहाणू नगर परिषद प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले.

“महाराष्ट्र व गुजरात मधील प्रशासनाच्या सहकार्याने आत्तापर्यंत हजारो खलाशी बांधवाना परत आणण्यात यश मिळाले आहे. पालकमंत्री दादासाहेब भुसे हे वेळोवेळी याविषयी माहिती घेत होते, तसेच पाठपुरावा देखील करत होते. सर्वच खलाशी बांधवाना वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याची, विलगीकरणाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची विनंती केली आहे.” – खासदार राजेंद्र गावित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here