पालघर: चायना राखीला स्वदेशी पर्याय; कोरोनाच्या संकटात गावपाड्यातील भगिनींची अभिमानास्पद कामगिरी..!

0
422

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तसेच सीमेवरील भारतीय जवानांना चीनकडून वारंवार त्रास देण्याच्या घटना घडत असल्याने संपूर्ण देशात सध्या चीनविरोधी सूर उमटतो आहे. सोशल मिडीयावर देखील अनेकजण चीनच्या वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन करत आहेत. देशात अनेक व्यापाऱ्यांनी बायकॉट चायना या संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या दुकानांमध्ये चीनच्या वस्तू मिळणार नाहीत असे बोर्ड देखील लावले आहेत. पालघर जिल्ह्यातील संबंध जनतेला अभिमान वाटावा अशी कामगिरी कोरोनाच्या संकटात गावपाड्यातील भगिनी करत आहेत. दरवर्षी भारतीय सणवार व मागणी यानुसार चीनमधील व्यापारी आपल्या उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत पाठवत असतात. बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असणाऱ्या राख्या देखील चीनमधून आयात केल्या जात होत्या. पालघरमधील गावपाड्यातील भगिनींनी कोरोनाच्या संकटात देखील हिम्मत न हरता जिद्दीने बांबूपासून राख्या बनवत चीनमधून येणाऱ्या राख्यांना स्वदेशी पर्याय दिला असून आता त्यांना विक्रीसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

सविस्तर बातमी अशी कि पालघर जिल्ह्यातील विवेक राष्ट्र सेवा समिती हि संस्था शेकडो महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचे काम करते. गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन न थांबता त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा दैनंदिन आयुष्यात अर्थार्जनासाठी फायदा व्हावा म्हणून बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी देखील मदत केली जाते. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेने अनेक महिलांना अगदी सहजतेने उपलब्ध होऊ शकणाऱ्या बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. चीनमधून येणाऱ्या राख्यांना स्वदेशी पर्याय देण्यासाठी अतिशय कलात्मक पद्धतीने बांबूपासून राख्या तयार करण्याचे सर्व प्रशिक्षित महिलांनी ठरवले त्यानुसार गेल्या वर्षी जवळ जवळ १५००० राख्यांची निर्मिती व विक्री करण्यात यश आले होते. त्यामुळे यावर्षी जास्त राख्यांची निर्मिती करून विक्री करण्याचे ध्येय ठेवत शेकडो भगिनी काम करत आहेत.

हस्तकलेतून वस्तू तयार करून गुजराण करणाऱ्या या महिलांवर कोरोनाच्या संकटामुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून तांदूळ व डाळ तर मिळाली मात्र तेल, मीठ या कुठून आणायच्या असा प्रश्न त्यांच्यासमोर होता व आजही आहे. विवेक राष्ट्र सेवा समिती या संस्थेने पुढाकार घेत समाजातील काही दानशूर लोकांच्या मदतीने आतापर्यंत दोनवेळा त्यांना लागणाऱ्या इतर वस्तूंची मदत पोहोचवली देखील, मात्र मुळात स्वाभिमानी बाणा असणाऱ्या या भगिनींनी कामातून पैसे मिळावी अशी अपेक्षा विवेक राष्ट्र सेवा समितीचे संचालक प्रदीप गुप्ता, व्यवस्थापक लुकेश बंड यांच्याकडे व्यक्त केली. संस्थेच्या प्रशिक्षण व रोजगार अधिकारी प्रगती भोईर यांनी येणारा रक्षा बंधन डोळ्यासमोर ठेवत वेगवेगळ्या राख्यांच्या निर्मितीचा पर्याय सुचवला. महिला भगिनींनी हा पर्याय स्वीकारत तत्काळ काम देखील सुरु केले मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या लॉक डाऊनमध्ये या राख्या विकायच्या कुठे असा मोठा प्रश्न संस्थेसमोर व कारागीर भगिनींसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे चीनविरुद्धच्या ‘वालेट’ लढाईत अग्रेसर असणाऱ्या या महिला सैनिकांकडून राख्यांची खरेदी करून त्यांना उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहन मुंबई ई न्यूज करत आहे. लवकरच यासाठी मुंबई ई न्यूज कडून एक मोहीम देखील हातात घेतली जाणार आहे. राख्यांची मागणी नोंदवण्यासाठी तसेच उपक्रमात योगदान देण्यासाठी पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर(७२७६६४४४६४) यांच्याशी संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here