वसई: बदलीच्या नियमांची एसीतैसी; मनपा मुख्यालयात वरिष्ठ लिपिक १० वर्षांपासून ठाण मांडून

0
362

वसई प्रतिनिधी – रुबिना मुल्ला:

वसई विरार महानगरपालिकेच्या काही विभागातील अधिकारी गेल्या आठ वर्षांपासून हलण्याचे नाव घेत नाहीत. प्रचंड आर्थिक व्यवहारांमुळे मुख्यालयातील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पगाराव्यतिरिक्त वरकमाई करण्याची जणू स्पर्धाच अधिकाऱ्यांमध्ये लागल्याचे चित्र दिसत आहे. यामधूनच प्रत्येक वर्षी बदल्यांचा हंगाम सुरू झाला की घोडेबाजाराच्या चर्चा जोरात रंगतात. यातूनच मर्जीतील अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण मसलती करून बदली प्रक्रियेत अभय मिळवतात. अगदी असंच काहीसं चित्र बांधकाम मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक यांच्या बाबत दिसत असल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक प्रकाश ठाकूर एकाच खुर्चीवर एकाच पदावर मागील १० वर्षे कार्यरत आहे. सरकारच्या नियमानुसार कोणत्याही अधिकाऱ्यांची ३ वर्षात बदली होते. अगदीच अडचणीच्यावेळी जास्तीत जास्त बदली प्रक्रियेस १ वर्ष मुदतवाढ वाढ दिली जाते. मात्र प्रकाश ठाकूर यांच्याबाबतीत जवळजवळ सर्वच नियम धाब्यावर बसविल्याचे दिसतं आहे.

ठाकूर यांची मागील १० वर्षांपासून एकदाही बदली झालेली नाही याबाबत महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना वारंवार निवेदन देण्यात आली आहेत. मात्र आजपर्यंत त्यांची एकदाही बदली झाली नाही तसेच ना ही त्यांच्यावर कोणती कारवाई झाली. यामुळे याप्रकरणी त्यांच्यावर बड्या अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे? का असा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी हि मागणी आता जोर धरू लागली आहे.

‘ती’ माहिती लपवली?

२० ऑक्टोबर २०२० रोजी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज देऊन याबाबत एका आरटीआय कार्यकर्त्याने माहिती मागवली होती. सदर माहिती न मिळाल्यामुळे १५ डिसेंबर २०२० रोजी अपिल दाखल करण्यात आले. २२ जानेवारी २०२१ रोजी या अपिलावर सुनावणी झाली आणि १० दिवसात माहिती देण्याचा आदेश अपिलिय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र अद्याप पर्यंत आस्थापना विभागाचे जन माहिती अधिकारी रविंद्र पाटील यांनी माहिती दिलेली नाही. रविंद्र पाटील माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे यादेखील प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here