इचलकरंजी: आरटीओ कॅम्प तथा वाहन पासिंग ट्रॅक तातडीने सुरु करा – इंदिरा ऑटो रिक्षा युनियनची मागणी

0
377

इचलकरंजी (प्रवीण पोवार):

तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या जागेत उभारण्यात आलेला आरटीओ कॅम्प तथा वाहन पासिंग ट्रॅक तातडीने सुरु करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन इंदिरा ऑटो रिक्षा युनियनच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. अल्वारिस यांना देण्यात आले.

या निवेदनात, इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील रिक्षा चालकांची संख्या अंदाजे 5 ते 6 हजार असून इतर वाहनांची संख्या अंदाजे 15 ते 20 हजार आहे. सर्वच वाहनधारकांना पासिंगसाठी कोल्हापूरातील मोरेवाडी येथे लांब अंतरावर जावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. वाहनधारकांची गरज ओळखून आमदार प्रकाश आवाडे यांनी तारदाळ येथील ल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या जागेत आवश्यक त्या नियमानुसार पासिंग ट्रॅक संस्थेच्यावतीने तयार करून दिला. त्याचे उद्घाटनही झाले आहे. परंतु त्याठिकाणी अद्याप कामकाज सुरु झालेले नाही. त्यातच मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्याने आरटीओ कार्यालयाचे कामकाजही बंद होते. काही दिवसांपासून आरटीओ ऑफिसचे कामकाज सुरू झाले असून तारदाळ येथील कामकाज बंद असल्याने पासिंगसाठी सर्वच वाहनधारकांना मोरेवाडी येथे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक व रिक्षा चालकांना त्रासदायक होत आहे. त्यातच कोरोनामुळे वाहतूक करणे धोकादायक ठरण्याचीशक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इचलकरंजी येथील पाच दिवसांचा ट्रॅक आठवड्यातले किमान दोन दिवस तरी याठिकाणी तातडीने चालू करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. अल्वारिस यांनी आता केवळ आरटीओ कार्यालय सुरु करण्यात आले असून कॅम्प मात्र बंद ठेवण्यात आले आहेत. वरिष्ठांकडून आदेश प्राप्त होताच कॅम्प सुरु करण्यात येतील. तारदाळ येथील पासिंग ट्रॅकच्या ठिकाणी काही किरकोळ बाबींची पुर्तता होणे बाकी असून त्याची पूर्तता होताच तोही सुरु होईल असे सांगितले.यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात लियाक गोलंदाज, विनोद माळी, आप्पासाहेब चव्हाण, उमर मुल्ला, शहनशाह फकिर, रफिक बागवान, अल्ताफ मुजावर यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here