पालघर – योगेश चांदेकर:
डहाणू तालुक्यातील उप जिल्हा रुग्णालय कासा येथील दोन कोरोनाबाधित डॉक्टरांच्या जोखमीच्या सहवासात आलेल्या डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी, उपचारासाठी दाखल रुग्ण यांच्यासह रुग्णाचे नातेवाईक अशा एकूण १८७ जणांना उप जिल्हा रुग्णालय कासा याठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये रुग्णालयातील रुग्ण ५७ (पैकी २२ नवजात बालकांचा समावेश), रुग्णांचे नातेवाईक ७२ तर रुग्णालय स्टाफ ५८ यांचा समावेश होता.
गुरुवार १६ एप्रिलला या सर्वांचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. १८७ संशयितांपैकी कालपर्यंत १९ संशयित (९ कंत्राटी कर्मचारी, १० रुग्णांचे नातेवाईक) पळून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने कासा पोलिसांना दिली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आणखी ५ संशयित पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र मेहनत घेत असताना अशाप्रकारे संशयितांचे पळून जाणे हे चिंता वाढवणारी गोष्ट आहे. उप जिल्हा रुग्णालय कासा येथून आत्तापर्यंत एकूण २४ कोरोना संशयित पळून गेले आहेत.
अफवांमुळे जमावाकडून अज्ञातांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळॆ पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढलेला असतानाच हि घटना समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग छातीचा कोट करत लढत असताना नागरिकांकडून सहकार्य होण्याऐवजी अडचणीतच भर पडत आहे. प्रसंगावधानता राखून पळून गेलेल्या संशयितांनी स्वतःहून रुग्णालयात उपस्थित राहणे हेच शहाणपणाचे ठरेल.