पालघर: अफवेचा कहर, चोर समजून तिघांची हत्या; पोलिसांकडून 100 जणांना अटक

0
434

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी आहे याच काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोर, दरोडेखोर, किडन्या चोरणारे येत असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. याच अफवांमुळे कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायवन गडचिंचले रोडवर धक्कादायक प्रकार घडला असून तीन प्रवाशांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

मुंबईमधील कांदिवली येथील तीन जण आपल्या इको करगाडीने सुरतकडे निघाले होते. या प्रवाशांना गडचिंचले येथे अडवून मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांची एक गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला व त्या तिघांना आपल्या गाडीत बसवले. पोलिसांच्या गाडीवरती जमावाने हल्ला चढवला यामध्ये त्या तीनही प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही पोलीस जखमी झाले. यामध्ये इको कार आणि पोलिसांची गाडीही फोडण्यात आली आहे.

हत्या झालेले दोन इसम साधू वेशातील तर एक वाहन चालक होते. मयताची दोघांची ओळख पटली असून नावे पुढील प्रमाणे मृतांची नावे महंत कल्पऋक्ष गिरी(वय 70 वर्षे अंदाजे), निलेश सुरेश तेलगडे (चालक- वय 30 वर्षे अंदाजे), चिकने महाराज(वय 35 वर्षे अंदाजे) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 100 हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे कासा पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले आहे.

अफवांमुळे गेल्या चार दिवसात प्रवाशांवर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरू नये असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी केलं आहे. जर कोणी अशा अफवा पसरवून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here