MUMBAI e NEWS –
पालघर-योगेश चांदेकर :
दि. २५ जानेवारी २०२० रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात १३० पालघर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ व विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. तसेच पालघर न्यायालय, लिगल एड समिती व सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय यांच्या वतीने “युवा” दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कर्तव्य तसेच “बलशाही लोकशाही करीता निवडणूक साक्षरता” या घोषवाक्यासह १० वा राष्ट्रीय मतदार दिवस हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थांनी शपथ घेतली. “मतदार जागृती अभियान” अंतर्गत आपली कर्तव्ये आणि आपले अधिकार तसेच मतदान प्रक्रिया, निवडणूक आयोग, निवडणूक ओळखपत्र (नोंदणी, दुरुस्ती) इत्यादी बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी ९ ते दुपारी २.०० वाजेपर्यंत विद्यालयात मदत केंद्र उभारले होते. विविध मान्यवरांनी सदर मदत केंद्रास भेट देऊन मोहिमेची माहिती घेतली.

पालघर न्यायालय व विधी महाविद्यालय यांनी “युवा दिन” कार्यक्रमाअंतर्गत विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्युनिअर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास पालघर अमरजीत जाधव सर यांनी तरूणांना आत्मविश्वासाने जगण्याचा मंत्र दिला. शिवाजी महाराजांनी प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर शुन्यातून विश्व निर्माण केले. आपल्या मनामध्ये खुप मोठी शक्ती आहे. ध्येय ठरवा तुमच्यातील ताकद वाढेल. स्वामी विवेकानंद यांचे विचार युवाशक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पाॅझिटिव्ह एनर्जी इज टू बी युज फाॅर सक्सेस असे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत. म्हणून तरूणांनी सतत सकारात्मक विचार करावा असे मत जाधव सरांनी मांडले.
तदनंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा यांनी राष्ट्रीय मतदार दिवस व युवा दिन बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. “युथ अॅन्ड देअर नॅशनल रिस्पाॅन्सिबिलिटिज् , रिस्पाॅन्सिबिलिटिज् बिगीन वीथ व्होटिंग” असे मत प्राचार्य डॉ.चोलेरा यांनी मांडले. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता सामुहिक शपथेने झाली. सदर कार्यक्रमास विधी प्राधिकरण पालघर व विधिज्ञ परिषदेचे पालघरचे मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here