पालघर – योगेश चांदेकर:
डहाणू तालुक्यातील चरी पाटीलपाडा येथील विरेंद्र राइ यांचे घर व घरातील किराणा दुकान शुक्रवारी दुपारी ११.३० च्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीसांनी सदर घटनेची नोंद घेत घटनास्थळाला भेट दिली. गावकामगार तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे..
आग लागली त्यावेळी विरेंद्र राइ यांची पत्नी हि घरातीलच पुढील बाजूला असणाऱ्या दुकानात होती. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. दुपारी १२.३० च्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत घराचा बराचसा भाग जाळून खाक झाला होता. शेजारील काही धाडसी युवकांनी वेळीच स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

चरी पाटीलपाडा येथील विरेंद्र राइ यांचे छोटेसे किराणा दुकान असून ते कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. या आगीमध्ये घरातील सर्व सामान जाळून खाक झाल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले. विक्रीसाठी आणलेले ब्लेझर कोट, पांघराण्यासाठीच्या गोधड्या, दुकानातील किराणा माल यासह इतर साहित्य, महत्वाची कागदपत्रे असा साधारण ४ ते ५ लाख किमतीचा मुद्देमाल जळाल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. विरेंद्र यांचे घर घर व घरातील वस्तू आगीत जळाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने त्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.