पालघर: ६५०० शिक्षकांच्या पगाराबाबत मोठी बातमी; दोन महिने वेतनापासून वंचित..!

0
348

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील काही शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता जिल्ह्याच्या कामासाठी कार्यरत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत त्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले. मात्र जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग यांनी आजवर शिक्षकांच्या पगारांविषयीचे महत्वपूर्ण काम अध्यापनासाठी नेमणूक असणाऱ्या शिक्षकावर सोपविले होते. त्यामुळे वारभुवन यांनी आदेश दिल्यानंतर, ते शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले. त्यानंतर जवळपास ६५०० शालार्थ शिक्षकांचे पगार तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून खोळंबले आहेत.

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना काही शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार तीनवेळा पगारपत्रक भरून दिल्यानंतर देखील डेटा करप्ट झाल्याचे तांत्रिक कारण देत पगारास विलंब केला जात आहे. त्यामुळे शिक्षकांची पगारासाठीची सॉफ्टवेअर प्रणाली नेमकं कोण कोण वापरत? कार्यालयीन वेळेत सुरक्षित सेव्ह झालेला डेटा दुसऱ्या दिवशी करप्ट कसा होतो? कार्यालयाबाहेर ते सॉफ्टवेअरमध्ये कुणी छेडछाड तर करत नाही ना? अशा शंका शिक्षकांमधून उपस्थित होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शालार्थ शिक्षकांसह जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांमधून पुढे येत आहे. दरम्यान शिक्षण विभागातील ज्या कर्मचाऱ्याकडे पगाराचे काम दिले आहे त्याने 6500 शिक्षकांच्या पगाराची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडायला हवी मात्र तीन वेळा पगार बिले री जनरेट करावी लागली म्हणजेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा संशय निर्माण होतो.

दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. वारभुवन यांच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे पालकांमधून कौतुक सुरु असताना त्यांच्या आदेशामुळे नियुक्तीच्या ठिकाणी जावे लागलेल्या शिक्षकांमधून पगाराच्या कामात अडथळा आणण्याचे उद्योग सुरु असल्याची शंका काही शालार्थ शिक्षकांनी बोलून दाखवली. अशाप्रकारे अडवणूक करणाऱ्या शिक्षकांवर वारभुवन यांच्याकडून कठोर कारवाई केली जाईल असा विश्वासही शालार्थ शिक्षकांच्या चर्चांमध्ये ऐकायला मिळतो आहे. जिल्हा शिक्षण विभागात चुकीच्या गोष्टीचा पायंडा पडत असताना शिक्षणाधिकाऱ्यांचं मात्र अक्षम्य दुर्लक्ष असल्याने अशा शिक्षकांचे फावल होत अशाही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शालार्थ शिक्षकांसह जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांमधून पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here