नो एन्ट्री …! महाराष्ट्र सीमावर्ती भागातील लोकांना गुजरातमध्ये प्रवेशास मनाई ; मातीचा ढिगारा टाकून उंबरगाव रस्ता केला बंद

0
373

पालघर – योगेश चांदेकर:

महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी या गावातील इंडिया कॉलनी येथील लोकांना ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या उंबरगावमध्ये जाणारा रस्ता मातीचा ढीग टाकून बंद केल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इंडिया कॉलनी पासून उंबरगाव हे केवळ पाचशे मीटर अंतरावर आहे. या कॉलनीत २०० कुटुंब राहत असून त्यांना मेडिकल, दुकान तसेच हॉस्पिटल या सुविधांसाठी ५० किलोमीटर अंतरावरील डहाणू शहरात जावे लागत आहे. कोरोनामुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पालघर प्रशासनाने गुजरात प्रशासनाशी समन्वय साधत या लोकांची अडचण दूर करावी अशी मागणी इंडिया कॉलनीतील लोकांकडून होत आहे.

इंडिया कॉलनीत राहणाऱ्या लोकांना गॅस कनेक्शन देखील गुजरातमधून देण्यात आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमधील ९० टक्के लोक हे उंबरगाव येथेच काम करतात. असे असूनही त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता रस्ता बंद करण्यात आला आहे. अशा परीस्थितीत जर एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्या व्यक्तीला ५० किलोमीटर अंतरावरील डहाणू येथे घेऊन जावे लागणार आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने काही अघटित घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील रहिवाशांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा बंद करत असताना निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here