पालघर: ‘लोकप्रतिनिधींनो, हे वागणं बरं नव्हं’; शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत..!

0
407

मुंबई ई न्यूज नेटवर्क:

रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी आरोपींना अटक करावी यासह इतर प्रमुख १३ मागण्यांसाठी ७ स्पटेंबर पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसलय. परंतु आमरण उपोषणाचा ७ वा दिवस संपत आला तरी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना काहीच सोयरसुतक नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. उपोषणाला बसलेल्या काही जणांची प्रकृती खालावली असून देखील लोकप्रतिनिधीनीं ना उपोषण स्थळास भेट दिली ना त्याबाबत एक अवाक्षर काढले. त्यामुळे ‘लोकप्रतिनिधींनो, हे वागणं बरं नव्हं..!’ अशी खंत उपोषणकर्ते व त्यांच्या समर्थनासाठी जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ स्पटेंबर पासून पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरच धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या उपोषणाला पालघर, ठाणे व रायगड़ जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. धरणे आंदोलनास शेकडोंच्या संख्येने शेतकरी जमा होणार असल्याची माहिती समन्वयक शेतकऱ्यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची लुबाडणूक झालेली असताना देखील त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे लोकप्रतिनिधींना काहीच पडले नाही अशी भावना अन्यायग्रस्त शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या काळात लोकप्रतिनिधींना अन्यायग्रस्तांच्या रोषास तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. किमान या इशाऱ्यानंतर तरी लोकप्रतिनिधींची पावले आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी वळण्याची सद्बुद्धी सुचेल का? हे येणारा काळच सांगेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here