पालघर: मुंबई ई न्यूजच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग; ‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई होणार..!

0
509

पालघर – योगेश चांदेकर:

२०१९ मध्ये क्यार व महा या चक्रीवादळांमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवेळी पावसामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची १०० टक्के शेती नष्ट होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने शेतपिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून आपले अहवाल राज्य शासनाकडे पाठविले. मात्र हे पंचनामे बोगस होते त्यामुळे १०० टक्के नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना कवडीमोल नुकसान भरपाई देण्यात आल्याची बातमी मुंबई ई न्युजने प्रसिद्ध केली. त्यामुळे खडबडून जागे झालेलं प्रशासन संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे समजते.

मुंबई ई न्यूजची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे फोन झटक्यात कव्हरेज मध्ये आले आणि सारवा-सारव करण्यासाठी मुंबई ई न्यूजच्या पालघर विभागाशी संपर्क सुरु झाला. डहाणू तालुक्यातील चिंचणी गावातील राहुल चुरी या शेतकऱ्यास सहा एकर भात शेतीचे नुकसान भरपाईपोटी केवळ १००० रुपये देऊन कृषी विभागाने थट्टाच केली होती. कोणतीही पीक पाहणी न करता बोगस अहवाल पाठवल्याचा आरोप शेतकऱ्याने सर्व पुराव्यानिशी केला. डहाणू तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी याबाबत खुलासा करत शासनाकडून काही मदत मिळणे बाकी असल्याने असे घडले असण्याची शक्यता वर्तवली. मात्र तपासणी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी देखील याबाबतचा चौकशी अहवाल मागविण्यात आला असून शहानिशा केल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरण, अनुदानित युरिया घोटाळा, सॅनिटायझर घोटाळा याप्रमाणेच शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या या प्रकरणात देखील मुंबई ई न्यूजने अन्यायग्रस्ताचा आवाज बनण्याचे कर्तव्य निभावले आहे. मुंबई ई न्यूजच्या दणक्याने आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास शेतकरी राहुल चुरी यांनी व्यक्त केला. तसेच २०१९ मधील नुकसान भरपाईपासून वंचित शेतकरी बांधवानी तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचं त्यांनी आवाहन मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here