पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना पुढे आल्यानंतर इतर सर्वच आरोपींचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. डहाणू पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या २० आरोपींपैकी १६ जणांचे रिपोर्ट आज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले सर्वांच्या सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित ४ जणांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या एकास कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्याअगोदर त्या आरोपसह इतर सर्वच आरोपींना डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तो कोरोनाबाधित आरोपी इतर आरोपींच्या संपर्कात आला होता. प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच आरोपी व पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.