पालघर – योगेश चांदेकर :
पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या चिंचणी गावात सुमारे 2500 च्या वर नळकनेक्शन धारक आहेत त्यांना जवळच्या साखरी धरणातून जिल्हा परिषद मार्फत पाणी पुरवठा केला जातो. परंतु येथील बहुसंख्य नळ कनेक्शन धारक ग्रामपंचायतला पाण्याची बिले भरत नसल्याने ग्रामपंचायतीची दयनीय अवस्था झाले आहे. पंचायतीला दर महा येणारे पाणीपट्टी बिल तसेच घरपट्टी भरत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अधिकारी बिल वसूल करण्यासाठी घरी गेले असताना कर्मचारी व नळधारकांच्यात भांडणे झाली. ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी नळधारकांना पाठीशी घालत आहेत असे ग्रामविकास अधिकारी यांच्या लक्षात आले आहे. त्यावेळी ग्रामविकास अधिकऱ्यानी लोकांना तसेच प्रतिनिधींना समजावून सांगितले कि बिल भरणे हे आपलं कर्तव्य आहे. सरपंच, प्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्यात मिटिंग झाली त्यामध्ये असे आढळून आले कि हि थकबाकी गेले कित्येक वर्षांपासूनची आहे त्यामुळे ती भरली पाहिजे.
परिणामी डहाणू पंचायत समिती (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) ने चिंचणी गावातील पाणी पुरवठा कपात केल्याने गेल्या सहा दिवसांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याविना वंचित राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे होळीच्या उत्सवात देखील पाणी न आल्याने ग्रामपंचायतीला वेळोवेळी प्रामाणिकपणे बिले आदा करणाऱ्या ग्रामीण नागरिकांचे हाल झाले आहे. चिंचणी येथे एकूण
नळ कनेक्शन 2500 च्या वर असून कुटुंब संख्या 5000 तर या ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 14 पाड़े आहेत. याकरिता साखरा डेम मधून दिवसाकाठी 10 ते 15 लाख लीटर पाणी नागरिकांना येते. ग्रामपंचायत चिंचणी यांनी पंचायत समितिला दिलेले चेक बाउंस झाल्याने ही कारवाई केल्याचे समजते.

येथील बहुसंख्य पाणीपुरवठा ग्राहकांवर ग्रामपंचायत चिंचणीची एकूण 1 कोटी थकबाकी झाली आहे. एकेक ग्राहकांवर पंधरा हजार, वीस हजार, तीस हजार एवढी थकबाकी झाली आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाने ग्राहकांना सूचना व नोटीस तसेच कायदेशीर कारवाई करण्यात आली असली तरी प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या आठ दिवसापासून ग्रामपंचायतीने प्रत्येक प्रभागात रिक्षा घेऊन थकबाकी धारकाचे नाव, रक्कम साऊंड स्पीकरवर जाहीर केली आहे. यापुढेही ग्राहकांची पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई ग्रामपंचायत प्रशासन करणार असल्याचे
ग्रामविकास अधिकारी निलेश जाधव यांनी सांगितली.
दरम्यान भर उन्हाळ्यात गेल्या सहा सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद केल्याने पाण्यासाठी लोकांचे डोळ्यात पाणी आले आहे चिंचणी गावातील अनेक प्रभागात तर पिण्याच्या पाण्याची विहीर नसल्याने महिलांना खाजगी बोरिंग धारकांकडून गडूळ पिण्याचे पाणी पिण्याची वेळ चिंचणी करांवर आली आहे. डहाणू पंचायत समितीकडून येणारे पाणी बिल ग्रामपंचायत चिंचणी भरू शकत नसल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.