पालघर: सारणी येथे आढळले वापरलेले पीपीई किट्स; परिसरात एकच खळबळ..!

0
477

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सारणी याठिकाणी दोन पीपीई किट्स रस्त्यावर टाकल्याचे आढळले असल्याने परिसरात एकचं खळबळ माजली आहे. सामाजिक कार्यकर्ते निवास वरठा हे गंजाड येथून चारोटीकडे जात असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आलेले दोन पीपीई किट्स दिसले. जर हे किट्स कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्याने वापरले असले तर संसर्ग देखील होऊ शकतो. त्यामुळे पुढील धोका ओळखून निवास वरठा यांनी स्थानिक आरोग्य विभागाला माहिती दिली असून संबंधित विभागाचे अधिकारी घटना स्थळी पोहचत असल्याचे समजते.

पालघर जिल्हा कोरोना रेडझोनमध्ये आल्याने जिल्ह्यातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे, आरोग्याच्या कामानिमित्त नागरिकांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस आदींना पीपीई किट्स देण्यात आल्या आहेत. सदर किट्स वापरल्यानंतर त्या कचऱ्यामध्ये न टाकता वेगळ्या ठेवल्या जातात आणि ठरावीक पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. मात्र पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सारणी येथील केनॉल परिसरात रविवारी रस्त्याच्या कडेला वापरलेल्या पीपीई किट्स आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या प्रकारानंतर पीपीई किट्सच्या योग्य विल्हेवाट लावण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गंजाड येथून चारोटीकडे जात असताना मला पीपीई किट्ससदृश्य २ वस्तू रस्त्याच्या कडेला पडलेल्या दिसल्या. मी त्याठिकाणी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्या वापरलेल्या पीपीई किट्स असल्याचे लक्षात आले. प्रकरण गंभीर असल्याने स्थानिक आरोग्य विभागाला माहिती दिली आहे. पीपीई किट्स वापरणारांनी त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायला हवी.” – निवास वरठा, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here