पालघर: शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याची आरोपीने दिली कबुली; एकाच्या पोलीस कोठडीत वाढ..!

0
389

पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्याच्या गुन्ह्यातील आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर एकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यामध्ये आरोपींनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे कबूली जबाब दिला आहे. दरम्यान मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोर पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली होती. पालघर न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणी जबाबात नव्याने नाव आलेले इतर ४ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे याप्रकरणाकडे लक्ष लागून आहे. मुंबई ई न्यूजने याबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद देण्याचे काम केले. आरोपी मधुकर सखाराम काकरा (रा. कोल्हाण), नारायण कान्हा डबके (रा. कोंडगाव), रुपेश पांडुरंग पाटील, दोषीराम कमळाकर घाटाळ, जानू रामा मोर यांच्यावर कलम ४२०, ३८४, ३८५, ५०४, ५०६, ३४ अन्वये मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत आरोपींनी शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईमधील ३५ टक्के रक्कम लुबाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस हे करत आहेत.

दरम्यान आज आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीत आपणांस मारहाण केल्याची तोंडी तक्रार आरोपी मधुकर सखाराम काकरा (रा. कोल्हाण) याने केली. त्यावर त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असता वैद्यकीय अहवालात मारहाण झाल्याच्या खुणा नसल्याचे समोर आले. आरोपी मधुकर सखाराम काकरा (रा. कोल्हाण) याने आपण शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे कबूल केले. आरोपी नारायण कान्हा डबके याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


“मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांचेकडे आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही नावे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाच आरोपीना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यापैकी एकाची पोलीस कोठडी ६ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करावा” – प्रशांत परदेशी, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा पालघर

पोलीस अधिकारी यांची नावे संपर्क क्रमांक:
प्रशांत परदेशी, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा पालघर – ८८८८८०८३२५
विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी; पालघर – ८८०५८१३३५३
प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर – ९९७५१२१२१२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here