पालघर: सांग सांग भोलानाथ ‘साकाव’ होईल काय?

0
290

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात भोपोली घाणेकर गृप ग्रामपंचायत असून १९००-२००० लोकसंख्या असणाऱ्या घाणेघर गावातुन भोपोली गावात जाण्या-येण्यासाठी साकाव बांधण्यात आलेले नाही. आजवर साधा साकाव किंवा फरशी (पूल) सुध्दा बनवण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळेला जाण्यासाठी कसरत करत जाणारे विद्यार्थी भोलानाथाकडे शाळेला सुट्टी मिळेल काय हे नाही तर साकाव होईल का असेच विचारतं आहेत. घाणेकर येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये किंवा इतर कामांसाठी जाताना त्यांना बोरांडे किंवा तलावली या गावातून ५ ते ६ किलोमीटर अंतर जास्तीचा फेरफटका मारून भोपोली गावात जावे लागत आहे. गावातील विद्यार्थ्यांना देखील शाळेत ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच १ ली ते १२ वी चे एकूण १५० विद्यार्थी आश्रमशाळेत व हायस्कूल भोपोली गावात शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणच्या ओढ्यावर साकाव बांधल्यास नागरिकांचे होणारे हाल कमी होतील.

दरम्यान घाणेघर ग्रामस्थांनी व पालकवर्गांने श्रमदान करून सदर नाल्यात लाकडी साकाव तयार केले आहे. असे असले तरी पावसाळ्यात या लाकडी साकावावरुन तारेवरची कसरत करतच ये-जा करावी लागणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच यांच्याकडे साकाव बांधणीसाठी वारंवार मागणी करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभाग विक्रमगड व जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे देखील विचारणा केली मात्र अद्याप प्रशासनाने या प्रश्नी लक्ष घातलेले नाही. वारंवार विचारणा केली असता रोहयो अंतर्गत काम मंजूर झाले असल्याचे व लवकरच काम सुरु होईल असे उत्तर ग्रामस्थांना देण्यात आले मात्र अद्याप साकावचे काम झालेले नाही.

“पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. गतवर्षी या ओढ्याला आलेल्या पुरात एक शाळकरी मुलगी वाहून गेली होती मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली होती. त्यामुळे किमान या वर्षी तरी साकावचे काम केले जावे ही अपेक्षा आहे” – महेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते – भोपोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here