पालघर: …तर पक्ष नेतृत्वाची ढाल करणाऱ्या ‘युरिया माफियांचं’ कालियामर्दन होईल..!

0
414

पालघर – योगेश चांदेकर :

कोरोना महामारीच्या काळात सर्व उद्योग संकटात असताना कृषी हे एकमेव क्षेत्र असे आहे ज्याचा जीडीपी हा समाधानकारक राहिला आहे, हे संपूर्ण देशाने पहिले. या गोष्टीचं श्रेय निश्चितच घाम गाळून, काबाडकष्ट करून फळ-धान्याच्या रास पिकवणाऱ्या बळीराजास जाते. नैसर्गिक आपत्तींशी दोन हात करत लढणाऱ्या शेतकऱ्यास, व्यवस्था मात्र नागवतानाच दिसते. समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणं, अन्यायग्रस्ताचा आवाज बनणं हे पत्रकारांचे मुख्य उद्दिष्ठ असते. मुंबई ई न्यूज सातत्याने आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहूनच अशी गैरकृत्य करणाऱ्यांना उघडे पाडत त्यांना आरसा दाखवण्याचे काम करत आहे. मात्र मगरीच्या कातडीच्या लोकांवर याचा परिणाम होत नाही त्यावेळी शाब्दिक आसूडांचे फटके देण्यावाचून पर्याय उरत नाही.

पालघर जिल्ह्यात युरियाच्या अफरातफरीसाठी एक मोठी लॉबी सक्रिय असून यामध्ये अनेक बड्या प्रस्थांचा समावेश असल्याचा खुलासा मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून केला होता. याबाबत पाठपुरावा करत मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर स्टिंग ऑपरेशनसाठी गेले असता षडयंत्र रचून त्यांना मारहाण करण्यात आली. मुंबई ई न्यूजच्या पाठपुराव्यानंतर कृषी विभागाने जिल्हयातील २० कृषी सेवा केंद्रांचा विक्री परवाना १५ दिवसांसाठी रद्द केला. बेहिशोबी युरियाच्या विक्री प्रकरणात हि कारवाई करण्यात आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा छुपा पाठींबा असल्यामुळे काळाबाजार चालतो अस दिसत आहे. दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच कृषीमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून काळाबाजार करणाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

दरम्यान दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्रांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा फोल ठरली. शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये हि कृषी विभागाची जबाबदारी आहे. मात्र आपल्या कर्तव्याचा या विभागातील अधिकाऱ्यांना विसर पडला आहे कि काय? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे कृषी विभाग युरिया माफियांची चौकशी करेल का? हे एक कोडेच आहे. युरिया माफियांकडून लोकप्रतिनिधींच्या नावाचा व पक्षाचा ढाल म्हणून वापर होताना दिसत आहे. त्यामुळे माफियांना अभय देणाऱ्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचं सोयरसुतक नाही का? कि ‘पैसा हेच सर्वस्व’ हे नवे ब्रीद जन्माला येत आहे? अशा लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांनी शेषनागाच्या डोक्यावर पाय ठेवणाऱ्या कृष्णाचं रूप धारण केल्यास युरिया माफियांचं कालियामर्दन झालंच म्हणून समजा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here