गोड बातमी: पालघरमधील १० जण कोरोनामुक्त; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित आज जाणार घरी!

0
398

पालघर – योगेश चांदेकर:

टिमा हॉस्पिटल येथे उपचार घेत असणाऱ्या ९ कोरोनाबाधितांचे १२ व्या व १४ व्या दिवसी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्या ९ कोरोना बाधितांमध्ये सफाळे येथील रुग्णांचा व त्या ३ वर्षीय मुलीच्या संपर्कातून कोरोनाची लागण झालेल्या काटाळे येथील रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथील एका महिलेचा देखील कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने तिला देखील आज घरी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे यांनी दिली आहे.

प्रशासनाने कठोर मेहनत घेत पालघर व डहाणू येथील एकूण ११ जणांची कोरोनातून सुटका केली आहे. २६ एप्रिलला त्या ३ वर्षीय चिमुकलीला कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले होते. आठवड्याभरातच आज पुन्हा १० जण कोरोनमुक्त झाल्याने प्रशासनावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आज दुपारी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत या कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना घरी सोडण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सागर पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे, डहाणू तालुका आरोग्य अधिकारी संदीप गाढेकर, पालघर तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांच्यासह आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित असणार आहेत. आरोग्य प्रशासन पालघर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी अतिशय कठोर मेहनत घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here