मुंबई ई न्यूज नेटवर्क | लस तुटवडा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लस खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्याची तयारी सुरू केली असली तरी मुंबईस लागूनच असलेली आणि महानगर क्षेत्रातील एक महत्त्वाची महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेसाठी अशी लस निविदा हे दिवास्वप्नच ठरेल अशी स्थिती आहे. करोना संकटामुळे उत्पन्नवसुलीवर झालेला परिणाम आणि त्यातच राज्य शासनाकडून येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानावर पालिका कर्मचाऱ्यांचे पगार भागविले जात आहे. यामुळे ठाणे महापालिकेला लस खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक भार उचलणे शक्य नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ४७ लसीकरण केंद्र आहेत. लस तुवडय़ामुळे यापैकी अनेक केंद्रे बंद आहेत. मुंबई महापालिकेने लशीचा तुटवडा लक्षात घेऊन लस खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईकरांचे जलदगतीने लसीकरण व्हावे यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले आहे. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, स्पुटनिक, फायझर आणि मॉर्डना या कंपन्यांच्या करोना प्रतिबंधक लशींना मान्यता मिळाली असून यापैकी कोणती कंपनी मुंबईकरांसाठी लस उपलब्ध करेल, हे जागतिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. प्राणवायूच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पावले उचलणारी ठाणे महापालिका मुंबईप्रमाणेच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ठाणे महापालिकेला अशी निविदा काढणे शक्य नसल्याचे समोर आले आहे.

करोनाकाळात महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून यामुळे महापालिकेने यंदाचा अर्थसंकल्प ९०० कोटी रुपयांनी कमी केला आहे. काही ठेकेदारांची देयके पालिकेने दिलेली नाहीत. तसेच राज्य शासनाकडून येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानातून पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात आहेत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यास गेल्या काही दिवसांपासून विलंब होत आहे. अशी परिस्थिती असल्यामुळे पालिकेला लस खरेदीच्या खर्चाचा भार उचलणे शक्य नाही, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

करोनाकाळात महापालिकेच्या उत्पन्नवसुलीवर मोठा परिणाम झाला असून यामुळे महापालिकेची अर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढणे शक्य नाही. ठाणे महापालिकेला ६० लाख लशींच्या मात्रा प्राप्त झाल्या तर १५ दिवसांत लसीकरण मोहीम फत्ते करणे शक्य होईल.

– डॉ. विपीन शर्माआयुक्तठाणे महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here